चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार, दि. 23 जुलै रोजी चिखलीत तीव्र पडसाद उमटले. एकीकडे चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रमक निषेध आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व विविध आंबेडकरी संघटनांनी स्वतंत्र शांततापूर्ण मोर्चा काढत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर चिखलीत आंदोलनाचे वातावरण तापले होते.
लोकनेते राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध केला. “विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारे सरकार हाय हाय”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सत्तेचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांवर दडपशाही करणाऱ्या सरकारला आगामी काळात सत्तेतून उलथवून टाकू, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला चिखलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचितचे शहराध्यक्ष बाळू भिसे यांच्या पुढाकारातून विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांनी स्वतंत्र मोर्चा काढला. व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याने प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
दोन्ही आंदोलनांतून विद्यार्थ्यांवरील कारवाईची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनासह वंचितच्या शांततापूर्ण बंदमुळे चिखलीत केंद्र सरकारविरोधातील असंतोष एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या आंदोलनांतून ठळकपणे समोर आला.










