जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) रक्ताच्या एका थेंबातून कुणाचा तरी जीव वाचू शकतो, हाच मानवतेचा संदेश देत जळगाव जामोद येथे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, २२ जुलै रोजी हे शिबिर उत्साहात पार पडले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला कृतीची जोड देत अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण आणि शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान म्हणजे अक्षरशः जीवनदान असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
आ.डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिबिराला नगराध्यक्ष गणेश दांडगे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पांडव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली. सक्षम नागरिकांनी केवळ आवाहनाची वाट पाहू नये; नियमित रक्तदानाचा संकल्प करून गरजूंसाठी जीवनदाता बनावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.










