नांदुरा (हॅलो बुलढाणा) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत खामगाव येथील एका शिक्षकाची तब्बल १० लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अब्दुल अजीम मोहम्मद अलीम, वय ४०, रा. पैठ मोहल्ला, नांदुरा यांनी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फेसबुकवर शेअर ट्रेडिंगसंदर्भातील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना ‘VIP Smart Live Hub’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. ग्रुपमधील व्यक्तींनी स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचे भासवत विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असा विश्वास निर्माण केला.
यानंतर तक्रारदाराला कथित ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. अॅपवरील कस्टमर केअर आणि व्हॉट्सअॅप नंबरद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, वेगवेगळी बँक खाती ‘नोंदणीकृत खाती’ असल्याचे सांगून त्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. तक्रारदाराने स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या खात्यांतून विविध टप्प्यांत एकूण ₹१०.२५ लाख पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, गुंतवणूक थांबवून पैसे परत मागितल्यानंतर खरा खेळ उघड झाला! आरोपींनी आधी पैसे ‘इन्व्हेस्ट’ झाल्याचे सांगत काही दिवस थांबण्यास सांगितले. त्यानंतरही रक्कम परत न करता उलट आणखी पैशांची मागणी करण्यात आली. सायबर क्राईममध्ये तक्रार करण्याचा इशारा देताच कथित आरोपींनी तक्रारदाराचा लॉगिन आयडी ब्लॉक करून संपर्क क्रमांक बंद केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. आता बुलढाणा सायबर पोलीस या ‘डिजिटल ट्रेडिंगच्या जाळ्या’मागील सूत्रधार आणि पैसे गेलेल्या बँक खात्यांचा माग काढणार का? याकडे लक्ष लागले आहे.










