डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) आणि परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अनेक स्कूल बसेस अक्षरशः ‘खटारा’ अवस्थेत रस्त्यावर धावत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रविकांत रामभाऊ आढाव यांनी केला आहे. अशा जुन्या, नियमबाह्य आणि विनापरवाना स्कूल बसेससह स्कूल बसच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर तात्काळ कारवाई करून वाहने जप्त करावीत, अशी मागणी त्यांनी २१ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आढाव यांच्या म्हणण्यानुसार, अनेक बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी नाही, अग्निशामक यंत्र नाही, आपत्कालीन दरवाजाची सुविधा नाही, तर काही वाहनांकडे वैध फिटनेस प्रमाणपत्रही नसल्याचा आरोप आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच RTOला जाग येणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
डोणगाव परिसरातील सर्व स्कूल बसेस आणि शालेय वेळेत विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी करून दोषी वाहने जप्त करावीत, अशी आढाव यांची ठाम मागणी आहे. आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी परिवहन विभाग किती तत्परतेने कारवाई करतो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.










