शेगाव (हॅलो बुलढाणा) देशभर गाजत असलेल्या ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाचे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये उमटले आहेत. मंगळवारी शेगाव शहर आणि तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आक्रमक ‘आक्रोश मोर्चा’ काढून केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हातात निषेधाचे फलक आणि तोंडात “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा घोषणा देत तरुणाईचा हा मोर्चा मुख्य मार्गाने थेट तहसील कार्यालयावर धडकला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शेगाव शहर दणाणून गेले.
NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित मारहाण आणि लाठीचार्जची चौकशी करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.
या मोर्चातून प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही शेगावच्या विद्यार्थ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. तहसील कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.










