spot_img
spot_img

घाटबोरीत ‘सरपंचगिरी’चा हटके अंदाज! खुर्ची सोडली, हातात फावडा घेतला अन् थेट तुंबलेल्या नाल्यात उतरले राजकुमार पाखरे; म्हणाले- सेवा भाषणाने नाही, कामाने दिसली पाहिजे!

मेहकर (हॅलो बुलढाणा) लोकप्रतिनिधी म्हटलं की बैठका, भाषणं, आश्वासनं आणि अधिकाऱ्यांना सूचना… मात्र मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार पाखरे यांनी ही पारंपरिक चौकट मोडत थेट हातात फावडा घेतल्याने गावभर त्यांच्या कामाची चर्चा रंगली आहे. गावातील घाणपाण्याने तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सरपंच स्वतः मैदानात उतरले आणि श्रमदानातून लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा जणू आदर्शच घालून दिला.

गेल्या काही दिवसांपासून गावातील विविध भागांत नाल्या तुंबल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे लक्षात येताच सरपंच पाखरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. केवळ कर्मचाऱ्यांची वाट न पाहता त्यांनी स्वतः फावडे घेऊन नाल्यांमधील गाळ आणि कचरा काढण्यास सुरुवात केली.

एवढ्यावरच न थांबता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील परिसरात साचलेला कचराही त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन साफ केला. सरपंच स्वतः स्वच्छता करत असल्याचे पाहून अनेक ग्रामस्थही या मोहिमेत सहभागी झाले.

‘स्वच्छ भारत’ केवळ पोस्टर आणि घोषणांमध्ये नको, तर प्रत्यक्ष कृतीत दिसला पाहिजे, हा संदेश पाखरे यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, आता गावातील नाल्यांची नियमित स्वच्छता करून ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. सत्तेची खुर्ची बाजूला ठेवून जनतेच्या समस्येत स्वतः हात घालणारा लोकप्रतिनिधी कसा असतो, याची घाटबोरीत सध्या जोरदार चर्चा आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!