बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्या ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’च्या गुंतागुंतीसमोर जगातील दिग्गज वैज्ञानिकही आजवर निश्चित उत्तर शोधत आहेत, त्याच विषयाकडे अवघ्या सातवीत शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राने नव्या नजरेतून पाहत जागतिक विज्ञानविश्वाचे लक्ष वेधले आहे. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी निधीश सोळंकी आणि त्याचा सहकारी अर्णव खापर्डे यांनी मांडलेली ‘टाइम रेझिस्टन्स थिअरी’ संशोधनात्मक स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकाशित झाली आहे.
या दोघांचे संशोधन युरोपियन संशोधन रिपॉझिटरी ‘झेनोडो’ तसेच ‘इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या कल्पक प्रयत्नांची चर्चा सुरू झाली आहे. गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम यांत्रिकी यांचा मेळ घालण्याच्या अत्यंत कठीण वैज्ञानिक प्रश्नाकडे त्यांनी ‘टाइम रेझिस्टन्स’ या संकल्पनेतून वेगळा दृष्टिकोन मांडला आहे.
विशेष म्हणजे, निधीश हा बुलढाणा जिल्ह्यातील कोलारा गावचा मूळ रहिवासी असून उद्योजक वसंत सोळंकी आणि डॉ. कविता सोळंकी यांचा सुपुत्र आहे. अवघ्या १२-१३ व्या वर्षी विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलेल्या निधीशच्या या झेपेमुळे कोलारासह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.










