spot_img
spot_img

जानेफळच्या शेतात जाणारा रस्ताच ‘गायब’… शेतकरी मदतीसाठी पोहोचला अन् पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी म्हणतो – ‘आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही!

जानेफळ (हॅलो बुलढाणा) अमडापूर ते केनवड महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना, या विकासकामाचा मोठा फटका जानेफळ येथील शेतकरी विश्वनाथन देविदास हिवराळे यांना बसला आहे. गट क्रमांक १३८ मधील त्यांच्या शेतात जाणारा पारंपरिक आणि हक्काचा रस्ता कंत्राटदार कंपनीने बंद केल्याने शेतकरी स्वतःच्याच शेतात जाण्यापासून वंचित झाला आहे.

जानेफळ ते मारुतीपेठ मार्गावरील डाखोरे गॅस एजन्सीजवळ हिवराळे यांची शेती आहे. महामार्गाचे काम पूर्ण करताना शेतात उतरण्यासाठी रॅम्प अथवा पूल ठेवण्यात आलेला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे बैलजोडी, ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे.

हिवराळे यांनी ‘पलसिद्ध कन्स्ट्रक्शन’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती करून पूल तयार करण्याची मागणी केली. मात्र कंपनीचे कर्मचारी श्याम पळसकर यांनी, “तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं कोणी काही करू शकत नाही,” अशी धमकीवजा आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे.

रस्ता बंद असल्याने हिवराळे यांना शेजारील शेतकऱ्याला पैसे देऊन त्याच्या शेतातून वाट घ्यावी लागली आणि कशीबशी खरिपाची पेरणी पूर्ण करावी लागली. शासनाचा महामार्ग होत असताना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यालाच पैसे मोजावे लागत असतील, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष का केले? कंत्राटदाराच्या मनमानीला पीडब्ल्यूडीचा मूक पाठिंबा आहे का? असे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शेतात जाण्यासाठी रॅम्प किंवा पूल तयार करावा, तसेच शेतकऱ्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिवराळे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!