spot_img
spot_img

‘५० वर्षे राबलो, तरी सरकारच्या नजरेत आम्ही कर्मचारी नाही?’ अंगणवाडी-आशा सेविकांचा बुलढाण्यात एल्गार; थकीत कोरोना भत्त्यासाठी आरपारची लढाई!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अल्प मानधनावर शासनाच्या विविध योजना घराघरांत पोहोचविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ‘मागणी दिना’निमित्त आणि आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या ‘काळा दिवस’ आंदोलनांतर्गत १० जुलै रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे व निदर्शने करण्यात आली.

राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी तब्बल ५० वर्षांपासून, तर आशा वर्कर्स व गटप्रवर्तक १८ वर्षांपासून अत्यल्प मोबदल्यात शासनाची आरोग्य, बालविकास आणि जनजागृतीची कामे करीत आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कामाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली; मात्र केंद्र सरकारने २०१८ पासून मानधनात एक रुपयाचीही वाढ केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांसमोर १ जुलैपासून २३ महिन्यांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. सेवेत कायम करणे, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी, किमान दहा हजार रुपये पेन्शन, थकीत प्रवास भत्ता, ऑनलाइन कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि एएनएम भरतीत आरक्षण या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात माया वाघ, सुवर्णा लाठे, वर्षा देशमुख, कल्पना बावस्कर, माया लाटे, आशा वाघ, अश्विनी पाखरे, शोभा पवार, सुनीता अहेर, सुषमा सोनवणे, अर्चना सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!