डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) परिसरात अवैध देशी दारू वाहतुकीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र समोर येत आहे. दररोज सकाळच्या सुमारास विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकींवरून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत असून, त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, डोणगाव येथून आरेगाव, लेहणी, करंजी, मादणी आणि वडजी या ग्रामीण भागात रोज सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास दारूचे बॉक्स पोहोचवले जात आहेत. विशेष म्हणजे, वाहतुकीसाठी विनानंबर दुचाकींचा वापर होत असल्याने या प्रकारामागे नियोजनबद्ध साखळी कार्यरत असल्याची चर्चा आहे.
या अवैध वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भरदिवसा मुख्य मार्गांवरून सुरू असलेली ही हालचाल नेमकी कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध दारू व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, तस्कर आणि पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित यंत्रणांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देत वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.










