बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “ज्यांच्या राजाश्रयामुळेच अवैध धंदे आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळाले, तेच लोक आज त्याविरोधात आंदोलन करत असतील तर ही बाब हास्यास्पद आहे,” असा घणाघाती आरोप उबाठा निष्ठावंत प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केला आहे.
बुलढाणा जिल्हाच नव्हे तर राज्यभर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे शेळके यांनी माध्यमांसमोर सांगितले. विशेष म्हणजे, आता भारतीय जनता पक्षालाच त्यांच्या मित्रपक्षाकडून घरचा आहेर मिळाला असून निदान यानंतर तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मात्र या आंदोलनामागे नेमके कारण काय, हेही तपासणे गरजेचे आहे, असे सांगत शेळके यांनी आणखी गंभीर प्रश्न उपस्थित केला. “कधी नव्हे ते आंदोलन करणाऱ्यांचे काही हितसंबंध दुखावले गेले आहेत का? त्यामुळेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे का? याची चौकशी व्हायलाच हवी,” असे त्या म्हणाल्या.
याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मंडप लावण्यास बंदी घालणारे आदेश काढले होते. मग आता सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली का? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आजही अनेक आंदोलक जिजामाता प्रेक्षागारासमोर चिखलात, घाणीत आणि पावसात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची मुभा मिळत असेल, तर बुलढाण्यात सामान्यांसाठी वेगळे आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल आता जनतेतूनही विचारला जात आहे.










