बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची सूत्रे आता जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या हाती आली आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र डॉ. रणजीत मंडाले यांची बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अर्थात DHO पदी नियुक्ती झाली असून, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
कर्तव्यनिष्ठ सेवा, अभ्यासू वृत्ती आणि आरोग्य विभागातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर डॉ. मंडाले यांनी हा मानाचा टप्पा गाठला आहे. आता जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, वेगवान आणि सर्वसामान्याभिमुख करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
डॉ. रणजीत मंडाले यांचा आरोग्य सेवेतील प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयातील ११ महिन्यांच्या सेवेतून केली. त्यानंतर मलकापूर पांगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी रुग्णसेवा दिली. पुढे यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमडी ही उच्च पदवी प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मेहकर येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. आता शासनाच्या ताज्या बदली आदेशानुसार त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची कमान सोपवण्यात आली आहे.
स्थानिक सुपुत्रच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या सर्वोच्च जबाबदारीवर विराजमान झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता, लोककल्याणकारी योजना आणि सर्वसामान्य रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचवणे, ही त्यांच्यासमोरील मोठी कसोटी असणार आहे.
“शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे डॉ. रणजीत मंडाले यांनी सांगितले.










