रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीस स्टेशन रायपूर येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन कर्तव्याच्या धावपळीत सतत तणावाखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला.
पोलीस सेवेतील जबाबदारी, सततची धावपळ, कायदा-सुव्यवस्थेचा ताण आणि अनियमित जीवनशैली यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर रायपूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेले हे योग शिबिर आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देणारे ठरले. उपस्थितांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून देण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होतो, शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत राहते आणि कार्यक्षमता वाढते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी ठाणेदार निलेश सोळंके म्हणाले की, पोलिसांच्या कामकाजात निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. योगामुळे मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे गरजेचे आहे.ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग शिबिर उत्साहात संपन्न झाले.











