spot_img
spot_img

महाब्रेकिंगचा जबरदस्त IMPACT! ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीनंतर FDA अॅक्शन मोडवर; जय अंबे स्वीट मार्टवर व्यवसाय बंदची नोटीस, पोलिसात गुन्हा दाखल!

मेहकर/जानेफळ (हॅलो बुलढाणा) काही तासांपूर्वी ‘हॅलो बुलढाणा’ने जानेफळ येथील कथित मिठाई कांडाची बातमी प्रसारित करताच प्रशासनाला अखेर जाग आली असून या प्रकरणात मोठा दणका बसला आहे. जय अंबे स्वीट मार्टशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा, मैदा पायाने तुडवतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला होता. ‘हॅलो बुलढाणा’ने हा प्रश्न थेट जनतेच्या आरोग्याशी जोडत अन्न व औषध प्रशासनाला सवाल विचारला होता. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अक्षय संजय भोपाळे यांनी कार्यालयीन प्रमुख प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दि. १८ जून २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी भोपाळे यांनी मे. श्री जय अंबे स्वीट मार्ट, अमडापूर रोड, जानेफळ या आस्थापनेची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी नियमन २०११ मधील परिशिष्ट ४ भाग १ च्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याच अनुषंगाने संबंधित अन्न व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, श्री. भवाराराम हिराराम प्रजापत यांच्या मालकीच्या या आस्थापनेबाबत व्हिडिओ व्हायरल झाला होता. विचारणा केली असता, व्हिडिओत दिसणारा इसम मादाराम गोकलराम प्रजापत हा पूर्वी कामावर असल्याचे सांगण्यात आले. तसेच तो सध्या दुकानात कामावर नसल्याचेही सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे अन्नपदार्थाचा साठा किंवा उत्पादन चालू असल्याचे आढळले नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ५९(ii) तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम २७४, २७५ अन्वये कारवाईची मागणी करण्यात आली असून, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी अहवाल, पंचनामा, बयान आणि संबंधित कागदपत्रेही सहपत्र म्हणून जोडण्यात आल्याची माहिती आहे.
प्रशासनाने केवळ नोटीसवर थांबू नये, तर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडकात कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे

जनहितार्थ 

नागरिकांनी मिठाई, नाश्ता किंवा कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करताना स्वच्छता, आणि उत्पादनाची स्थिती तपासावी. संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांना कळवा. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना उघडे पाडणे हीच खरी समाजसेवा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!