spot_img
spot_img

महाब्रेकिंग! जानेफळच्या मिठाई कारखान्यात ‘किळसवाणा कांड’; पायाने मैदा मळतानाचा व्हिडिओ व्हायरल! तुकाराम मुंढे साहेब, इकडेही नजर टाका! कथित मिठाई कांडाने जिल्ह्यात खळबळ!

मेहकर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील जानेफळ येथून धक्कादायक प्रकार समोर आला असून, जय अंबे स्वीट मार्टशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा मैदा पायाने मळला जात असल्याचे दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांच्या संतापाचा अक्षरशः उद्रेक झाला आहे.

स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप होत असून, आपण पैसे देऊन मिठाई घेतो की आजार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ निर्मिती केंद्रातही ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था असावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अधिक गंभीर मानला जात आहे. एकीकडे राज्यात हॉटेल, स्वीट मार्ट आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर स्वच्छतेबाबत कडक नजर ठेवली जात असताना, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील या कथित प्रकारामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित हॉटेल चालकाने त्या कामगाराला कामावरून कमी केल्याची चर्चा आहे. मात्र, केवळ कामगाराला काढून प्रश्न सुटणार आहे का? कारखान्यात स्वच्छतेचे नियम पाळले जात होते का? खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक परवाने, तपासणी आणि स्वच्छतेच्या अटींचे पालन केले जात होते का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

हॅलो बुलढाणा तर्फे अन्न व औषध प्रशासनाला थेट सवाल आहे की, या व्हिडिओची तातडीने चौकशी होणार का? संबंधित आस्थापनाची तपासणी करून नमुने घेण्यात येणार का? दोष आढळल्यास परवाना निलंबित करून कडक कारवाई होणार का?

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही मुभा मिळू नये. आज जानेफळ, उद्या कुठे? त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलून नागरिकांचा विश्वास परत मिळवणे अत्यावश्यक आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!