रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) अनेक वर्षांपासून रखडलेला रायपूर येथील शेतरस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाच्या ठोस भूमिकेमुळे निकाली निघाला आहे. बुलढाणा तहसीलदार अनंता पाटील यांनी एमसीए-5 अंतर्गत 25 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करत भाग क्र. 1, गट क्रमांक 272 मधील शेतरस्ता पोलीस बंदोबस्तात खुला केला. या कारवाईमुळे परिसरातील 300 हून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी मा. अप्पर तहसीलदार सौ. निकिता गद्रे, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच रायपूर पोलीस प्रशासन उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कारवाईचे साक्षीदार ठरले.
प्रशासनाने कोणताही वाद वाढू न देता कायदेशीर प्रक्रियेने रस्त्याच्या सीमारेषा निश्चित केल्या. दहा फूट रुंदीच्या चुन्याच्या खुणा आखून ग्रामस्थांच्या उपस्थितीत संबंधित शेतरस्ता खुला करण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी महसूल प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत सहकार्याची भूमिका घेतली.
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रॅक्टर, बैलगाडी, मोटारसायकल, सायकल तसेच शेती उपयोगी वाहने आता थेट शेतापर्यंत जाऊ शकणार आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतूक, खत-बियाणे ने-आण, कृषी अवजारे पोहोचवणे अधिक सोपे होणार असून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार आहे.
महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली. वर्षानुवर्षे अडकलेला प्रश्न मार्गी लागल्याने रायपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या धडाकेबाज निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.










