spot_img
spot_img

“भीक द्या… कंगाल सरकारसाठी भीक द्या!” बुलढाण्यात शेतकऱ्यांचे अनोखे भीक मागो आंदोलन; रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला वाढता पाठिंबा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असतानाही सरकारने अद्याप दखल न घेतल्याने शेतकरी संतापले आहेत. याच संतापातून आज बुलढाण्यात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात अनोखे आणि आक्रमक “भीक मागो आंदोलन” केले.

“भीक द्या, भीक द्या… कंगाल सरकारला भीक द्या!” अशा घोषणा देत शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून फेरी काढली. ॲड. शर्वरी तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दुकानदार, व्यापारी आणि नागरिकांनी झोळीत पैसे टाकून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे; मात्र अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अटी-शर्तींचा डोंगर उभा केला जात आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील, तर आमच्याकडून भीक घ्या; पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या,” असा संतप्त संदेश यावेळी देण्यात आला.

मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. नंतर निवडक प्रतिनिधींना आत सोडण्यात आले. आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम आणि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले.

शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल, असा कडक इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!