spot_img
spot_img

कर्जमुक्ती आंदोलनाचा दुसरा दिवस; प्रशासनाचे दुर्लक्ष? तुपकरांचा थेट इशारा – “माझ्या जीवाला काही झाले तर सरकार जबाबदार!”

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज, १६ जून रोजी दुसरा दिवस असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनाला २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. एवढेच नव्हे तर उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकही दाखल झालेले नाही. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त नसल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील निवासस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेवर रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला. “मी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अन्नत्याग करत आहे; पण प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील,” असा इशारा त्यांनी दिला.

काही अधिकारी सत्ताधाऱ्यांचे चमचे म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोपही तुपकर यांनी केला. आंदोलन दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आंदोलनस्थळी हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला तर सत्ताधाऱ्यांना लपायलाही जागा मिळणार नाही, असा घणाघात तुपकर यांनी केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!