spot_img
spot_img

कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुलीची OTS योजना! सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीकविम्यासाठी रविकांत तुपकर आमरण अन्नत्यागावर

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेली कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक करणारी “वन टाईम सेटलमेंट” योजना असल्याचा गंभीर आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आजपासून बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानासमोर आमरण अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली अटी, निकष आणि कागदी घोळ निर्माण करून खऱ्या अर्थाने कर्जमाफीपासून शेतकऱ्यांना दूर ठेवले आहे, असा आरोप तुपकर यांनी केला. “ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना आहे. शेतकऱ्यांना सरसकट, विनाअट आणि विनानिकष कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. तसेच हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत मी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

तुपकर यांनी यापूर्वी विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी केवळ घोषणा आणि आश्वासनांचा खेळ सुरू ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जीवाची बाजी लावण्याची वेळ आली आहे, असे तुपकर यांनी स्पष्ट केले.

“एकतर सरकार झुकेल किंवा आम्ही शेतकरी; पण सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही,” असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या आमरण अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!