spot_img
spot_img

क्रांतिकारी शेतकरी संघटनेला मिळाले कायदेतज्ञांचे बळ! ॲड. प्रवीण सुरडकर यांच्यासह नामवंत वकिलांचा जाहीर प्रवेश

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दि. 12 जून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांसाठी व सर्व घटकातील नागरिकांसाठी लढणाऱ्या या संघटनेला आता कायदेतज्ञांचेही बळ मिळाले आहे. ॲड. प्रवीण सुरडकर यांच्यासह ॲड. अमोलकुमार गवई, ॲड. अक्षयअप्पा तोत्रे, ॲड. राम अंभोरे, सुमित जुमडे, भूषण सोनुने, शाम सपकाळ व इतर वकील बांधवांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत संघटनेत जाहीर प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या सर्वांचे संघटनेत स्वागत केले.

बुलढाणा येथील क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरमध्ये झालेल्या एका उत्साहपूर्ण कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक नामवंत वकील बांधवांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संघटनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने प्रवेश केलेल्या वकील बांधवांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेश सोहळ्यानंतर संघटना अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाला अधिक बळकटी कशी देता येईल, कायदेशीर लढाया अधिक प्रभावीपणे कशा लढता येतील तसेच संघटनेची राज्यभरातील ताकद कशी वाढवता येईल याबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली. यावेळी उपस्थित सर्वांनी आगामी काळात संघटना अधिक व्यापक, संघर्षशील आणि लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले की, ॲड. प्रवीण सुरडकर,ॲड. अमोलकुमार गवई व इतर वकील बांधवांच्या संघटनेतील प्रवेशामुळे कायदेतज्ञांचे विशेष बळ आपल्याला मिळाले आहे. शेतकरी चळवळीला आता कायदे क्षेत्रातील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींची साथ लाभल्याने संघटनेच्या न्यायलढ्यांना अधिक धार प्राप्त होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी, सुशिक्षित युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक अशा सर्वच घटकांसाठी आपल्याला काम करायचे आहे. शेती आणि मातीसाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपण सज्ज आहोत तसेच शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीही आपण पूर्ण ताकदीने तयार आहोत,असे देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेला हा प्रवेश सोहळा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वाढत्या जनाधाराचे प्रतीक ठरला असून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे, अशा भावना यावेळी ॲड. प्रवीण सुरडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!