spot_img
spot_img

संतनगरी शेगावात जगद्गुरू नरेंद्राचार्यजींचा दर्शन सोहळा; 14 व 15 जूनला भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था!

शेगाव (हॅलो बुलढाणा) संतनगरी शेगाव येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. 14 व 15 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, एम.एस.ई.बी. चौक, खामगाव रोड, शेगाव येथे होणार आहे, अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक सुरेश मोरे व पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने भाविकांना प्रवचन, समस्या मार्गदर्शन आणि दर्शनाचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमात 14 जून रोजी साधक दीक्षा तर 15 जून रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी दीक्षेसाठी नोंदणी करून या आध्यात्मिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संस्थानाच्या वतीने केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू आहे. ग्रामस्वच्छता अभियान, मोफत इंग्रजी माध्यम शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिरे, मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व घरघंटी वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, आपत्कालीन मदत, कायदेविषयक साक्षरता शिबिरे असे विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर संस्थानाच्या 53 मोफत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या सेवेत 24 तास कार्यरत आहेत.

या सोहळ्यासाठी दोन्ही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक, भक्त, साधक, शिष्य व हितचिंतकांनी सहकुटुंब उपस्थित राहून जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ समिती व संतसंग सेवा समितीने केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!