spot_img
spot_img

शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDA चा छापा! कच्च्या मालाचे नमुने घेतले; भेसळ आढळल्यास कारवाईचा इशारा

शेगाव (हॅलो बुलढाणा) शेगावची ओळख म्हटलं की संत गजानन महाराजांची पावन नगरी आणि इथली प्रसिद्ध कचोरी! मात्र याच प्रसिद्ध कचोरीच्या गुणवत्तेबाबत आता अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर म्हणून ओळख असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकत कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर ही तपासणी मोहीम अधिक आक्रमक पद्धतीने राबवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेगावमधील या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर काल सायंकाळी अचानक कारवाई करण्यात आली.

शेगाव येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यापैकी अनेकजण येथे प्रसिद्ध कचोरीचा आस्वाद घेतात. त्यामुळे ही कचोरी नेमकी कोणत्या कच्च्या मालातून तयार केली जाते? वापरण्यात येणारे तेल, पीठ, मसाले आणि इतर साहित्य दर्जेदार आहे का? स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक छापा टाकला.

या कारवाईदरम्यान कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता संपूर्ण लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे. तपासणी अहवालात जर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळले, तर संबंधित कचोरी सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शेगावच्या प्रसिद्ध कचोरीवर लाखो भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे या तपासणी अहवालातून नेमके काय समोर येते, याकडे शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!