बुलढाणा (हॅलो बुलढाणा) १०० कोटींच्या अब्रू नुकसानीच्या नोटिशीवरून पेटलेला राजकीय वाद आता वैयक्तिक टीका-टिप्पणीपर्यंत पोहोचला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी ज्येष्ठ वकील ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत आमदार संजय गायकवाड यांना नोटीस पाठवल्यानंतर गायकवाडांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सरोदे यांच्या नावावरून “अर्धे हिंदुस्तानी, अर्धे पाकिस्तानी” असा वादग्रस्त उल्लेख केला. यावर आता ॲड. सरोदे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
“आ. गायकवाडांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, असे दिसते,” अशी बोचरी टीका करत सरोदे यांनी गायकवाडांच्या वक्तव्याला बदनामीकारक आणि अनावश्यक म्हटले. नावावरून टिप्पणी करणे चुकीचे असून, सार्वजनिक जीवनात बोलताना जबाबदारीची जाणीव असावी, असेही त्यांनी सुनावले.
‘असीम’ या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘ज्याला सीमा नाही’ असा होतो, असे सांगत सरोदे यांनी गायकवाडांना संस्कृत आणि संस्कृतीची आठवण करून दिली. “पुतळे लावणे म्हणजेच देशभक्ती नव्हे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटिशीपासून सुरू झालेला हा वाद आता कायदेशीर आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर तापला असून, पुढे याला कोणते वळण मिळते, याकडे बुलढाण्याचे लक्ष लागले आहे.











