लोणार (हॅलो बुलढाणा) तालुक्यात पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार एका पक्षाचा ‘पोपट’ कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा कथित पत्रकार अधिकाऱ्यांवर बातम्यांचा दबाव टाकून, नंतर पाठपुराव्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळत असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुकाभर रंगली आहे.
अधिकारी-कर्मचारी चुकत असतील, तर पत्रकाराचे काम प्रश्न विचारणे, जनतेच्या बाजूने आवाज उठवणे आणि सत्य बाहेर आणणे आहे. मात्र बातमी लावायची, दबाव तयार करायचा आणि नंतर दिवसा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन रात्री “सेटलमेंट”च्या नावाखाली उकळपट्टी करायची, असा प्रकार जर घडत असेल तर तो पत्रकारितेचा अपमान आहे.
विशेष म्हणजे नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे उकळल्याची चर्चा असल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वतःला मोठा विचारवंत समजणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराला खरंच लाज वाटत नाही का? असा सवाल आता लोणार तालुक्यात उपस्थित होत आहे.
पत्रकारिता ही समाजसेवेची जबाबदारी आहे; ती दलाली आणि ब्लॅकमेलिंगचे दुकान नाही. या चर्चेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.












Total Users : 3545213