बुलढाणा (हॅलो बुलढाणा)औद्योगिक, सहकार, महामंडळे आणि गिरणी कामगारांच्या हक्काच्या पेन्शनवाढीसाठी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला EPS-95 पेन्शनधारकांचा लढा आता निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचे चित्र बुलढाण्यात पाहायला मिळाले. राष्ट्रीय संघर्ष समितीचा ९ वा वर्धापन दिन जिजामाता प्रेक्षागारासमोरील ऐतिहासिक धरणे आंदोलनस्थळी उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरा करण्यात आला.
६ जून २०१७ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून देशभरातील लाखो पेन्शनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे. बुलढाण्यातील हे धरणे आंदोलन गेल्या ७ वर्षांपासून अविरत सुरू असून, वयोवृद्ध पेन्शनधारकांचा हा संघर्ष आजही तितक्याच जिद्दीने सुरू आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कमांडर अशोक राऊत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उपस्थित होते. यावेळी डॉ. पालवे व सौ. पालवे यांचीही विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यात समितीतील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आणि आंदोलनात सक्रिय असलेल्या ज्येष्ठ पदाधिकारी व सभासदांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राधेश्यामजी चांडक यांनी पेन्शनधारकांना परखड संदेश दिला. “मतदानाची ताकद दाखवा, तरच शासन तुमची दखल घेईल,” असे सांगत त्यांनी संघटनशक्ती आणि राजकीय जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी बुलढाणा अर्बनच्या सहकार क्षेत्रातील प्रवासाचा दाखला देत, प्रामाणिकपणे आणि चिकाटीने लढल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास उपस्थितांमध्ये निर्माण केला. अध्यक्षीय भाषणात कमांडर अशोक राऊत यांनीही, कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
बुलढाणा, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व सभासद या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक वर्षांपासून हक्काच्या पेन्शनसाठी झगडणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांचा आवाज आता अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे सात वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासन दखल कधी घेणार, हा प्रश्न आता अधिक टोकदार झाला आहे.










