spot_img
spot_img

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश! मेहकर डेपोला 30 नव्या बसांची मंजुरी; प्रवाशांच्या अडचणींना मिळणार दिलासा

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर मतदारसंघातील प्रवाशांच्या वाढत्या अडचणी आणि बससंख्येतील घट यावर अखेर मोठा निर्णय झाला आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या ठोस मागणीला यश आले असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मेहकर बस डेपोसाठी 30 नव्या बस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मेहकर बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वीच ही घोषणा झाल्याने मेहकरसह परिसरातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मेहकर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार सिद्धार्थ खरात यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मेहकर डेपोला 40 नव्या बस देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मेहकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे उपस्थित होते. त्यांनीही मेहकरच्या सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या वाढीसाठी या मागणीला पाठिंबा दिला.

मेहकर डेपो हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि मोठा बस डेपो मानला जातो. सध्या येथून 113 प्रवासी फेऱ्या होत आहेत. मात्र विविध गावांमधून नव्या फेऱ्यांची मागणी वाढत असताना बससंख्या कमी झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 2018 मध्ये मेहकर डेपोमध्ये 102 बस उपलब्ध होत्या; परंतु सध्या ही संख्या केवळ 81 वर आली आहे. लोकसंख्या आणि प्रवासीसंख्या वाढत असताना बस कमी होणे ही गंभीर बाब असल्याचे आमदार खरात यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आमदार खरात यांच्या पाठपुराव्याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमस्थळीच मेहकर डेपोसाठी 30 नव्या बस देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना, विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार धीरज लिंगाडे, विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात व नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते परिवहन मंत्री सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला.

मेहकरच्या वाहतूक विकासाला नवे बळ देणारी ही घोषणा असून आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्यामुळे मेहकर डेपोला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!