बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज भारतीय जनता पार्टीचा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्री. नारायण हेलगे तसेच काँग्रेसचे वक्ता विभाग अध्यक्ष रवी पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समर्थ व विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देत, त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही देण्यात आली. या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा शहरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्डे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे, जिल्हा सचिव डॉ. मधुसूदन सावळे, ॲड. मोहन पवार, विनायक भाग्यवंत, मुन्ना बेंडवाल, नगरसेवक आकाश दळवी, संजय मोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










