डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) ग्रामीण भागात एसटी स्मार्ट कार्ड नोंदणीच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सवलतधारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असली, तरी या योजनेच्या नोंदणीदरम्यान काही खाजगी एजंट आणि केंद्रचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने जादा पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महामंडळाच्या नियमानुसार नवीन स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये GST सह शुल्क निश्चित आहे. तर जुने कार्ड जमा करून नवीन कार्ड घेणाऱ्यांसाठी १४९ रुपये शुल्क आकारणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी किमान १०० रुपयांचा टॉप-अप आवश्यक असू शकतो. मात्र डोणगाव ग्रामपंचायत परिसरात २२ मे २०२६ रोजी झालेल्या कॅम्पमध्ये प्रवाशांकडून सरसकट ३०० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही प्रवाशांना १९९ रुपयांची पावती देऊन प्रत्यक्षात ३०० रुपये वसूल केल्याचेही सांगितले जात आहे. अधिकृत पावती मागितल्यास टाळाटाळ केली जाते, तर “३०० रुपये दिले तरच कार्ड मिळेल” अशी उद्धट भूमिका घेतली जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक एसटीच्या सवलतीवरच अवलंबून असतात. अशा प्रवाशांची अडवणूक करून त्यांच्या खिशाला कात्री लावणे हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाची एसटी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बनावट ग्राहक पाठवून तपासणी करावी, जादा पैसे घेणाऱ्या केंद्रचालक आणि एजंटवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांनी खाजगी एजंटकडे जाण्याऐवजी थेट जवळच्या एसटी डेपोमध्ये नोंदणी करावी. तसेच कार्ड फी आणि रिचार्जची स्वतंत्र पावती मागावी. जादा पैसे मागणाऱ्यांची तक्रार संबंधित आगार व्यवस्थापकांकडे करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.










