चिखली (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांची लूट करून विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या धनदांडग्या अडत्यांविरोधात अखेर सहकार प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठी धाड टाकण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्त झालेल्या सहाय्यक निबंधक तथा प्रशासन अधिकारी स्वरूपा धुमाळ यांनी “लेडी सिंघम” स्टाईल कारवाई करत अवैध व्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
दिनांक 15 मे 2026 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाचे विशेष पथक 18 संशयित व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी मैदानात उतरले. यावेळी अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बंद आढळली तर काही व्यापारी कारवाईच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा बाजार समिती परिसरात रंगली. तीन व्यापाऱ्यांची तपासणी अर्धवट राहिली असून त्यांच्या विरोधात मोठी प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासणीदरम्यान काही व्यापाऱ्यांकडे परवाना मुदत संपलेला असतानाही शेतमाल खरेदी सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाची बेकायदेशीर खरेदी करून शासन महसूल व नियमांना हरताळ फासणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सहकार प्रशासनाने स्पष्ट इशारा देत विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी व शेतकऱ्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बुलढाणा येथे द्यावी, असे आवाहन केले आहे. चिखलीतील या धडक कारवाईमुळे अवैध अडत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढचा नंबर कोणाचा? याचीच चर्चा सध्या बाजार समितीत सुरू आहे.












Total Users : 3546337