बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चैतन्यवाडी परिसरात शनिवारी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. Maharashtra State Electricity Board कडून तब्बल चार तास वीज बंद ठेवण्यात आल्याने उद्याच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हजारो विद्यार्थ्यांची तयारी अक्षरशः खोळंबली.
सध्या जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट असून तापमान उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत पंखे, कूलर आणि एसी बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात अभ्यास करणे भाग पडले. अनेकांनी मेणबत्ती व मोबाइलच्या प्रकाशात अभ्यास सुरू ठेवला, मात्र यामुळे एकाग्रतेवर मोठा परिणाम झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, चैतन्य वाडी परिसरात अनेक क्लासेस व अभ्यासिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. उद्याचा पेपर आयुष्यातील टर्निंग पॉइंट असताना अशी बेफिकीर वीज कपात का? असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही वीज वितरण यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षा काळात अखंड वीजपुरवठा देणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असताना, अशा प्रकारे अचानक वीज खंडित करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी हार न मानता जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आहे. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन परीक्षा कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची तातडीची गरज आहे.











