spot_img
spot_img

मोतीलाल अग्रवाल जालना मर्चंट को-ऑप. बँक प्रकरण: देऊळगाव राजा शाखेत मोठा आर्थिक घोटाळ्याचा आरोप, खळबळ!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) येथील मोतीलाल अग्रवाल जालना मर्चंट को-ऑप बँक लि., जालना शाखा मध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि फसवणुकीचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत निलेश्वर शेषराव भोंसले याच्यासह काही बँक अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर संगनमताने कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, निलेश्वर भोंसले याने अनेक नागरिकांना “व्यापार, ट्रेडिंग व गुंतवणूक” याचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते उघडून घेतले. सुरुवातीला विश्वास संपादन करून दस्तऐवज, चेकबुक व कोरे स्टॅम्प घेण्यात आले आणि नंतर या खात्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप आहे. खातेदारांना त्यांच्या व्यवहारांची पूर्ण माहिती न देता संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात बँकेचे काही अधिकारी, विशेषतः मॅनेजर गोपाल शिंदे यांच्यासह काही कर्मचारी आणि कथित सहकारी रायचंद कुरंगळ, मोहन मघाडे यांचा सहभाग असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मोबाईल नंबर बदल, मेसेज अलर्टमध्ये छेडछाड आणि KYC नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार शक्य नाही. या प्रकरणात IT Act, RBI मार्गदर्शक तत्त्वे तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेक खातेदार आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!