बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजप नेते मुन्ना बेंडवाल यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर थेट आरोपांची सरबत्ती केली आहे. “माझ्या मुलाला जाणीवपूर्वक टारगेट करून निलंबित करण्याचा कट रचला जात आहे,” असा संताप बेंडवाल यांनी व्यक्त केला.
बेंडवाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा नगरपालिका सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याने सॅनिटरी इन्स्पेक्टर (SIT) कोर्स पूर्ण करून मुंबईला प्रस्ताव पाठवला.या प्रक्रियेसाठी आम्हाला तब्बल आठ वेळा मुंबईच्या फेऱ्या मारायला लावल्या. मी स्वतः चार वेळा आमदारांसोबत गेलो, मात्र दोन्ही फाईली आमदारांनीच गहाळ केल्या आणि आम्हाला ‘फाईल कुठे गेली?’ असे सांगून आमची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला.
सध्या माझ्या मुलाला गैरहजर दाखवून निलंबित करण्याची कारवाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.मी सर्व कागदपत्रे आणि फिटनेस सर्टिफिकेट संबंधित अधिकाऱ्यांकडे दिले असतानाही आमदारांनी ‘कामावर घेऊ नका’ असे आदेश दिले, असेही बेंडवाल म्हणाले.
याचवेळी त्यांनी नगर परिषद मध्ये कार्यरत सुनील बेंडवाल यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत ते वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कसे टिकले? कोणाची कृपा आहे? असा सवाल उपस्थित केला.
राजकीय आरोपांदरम्यान बेंडवाल यांनी मागील काळात बुलढाणा शहरातील दंगल प्रकरणाचाही उल्लेख करत मोठा दावा केला. “त्या वेळी माजी नगरसेवक तथा नगराध्यक्षपती सज्जाद हजारो लोकांसह गायकवाड यांच्या घरी हल्ल्यासाठी निघाले होते, पण मीच त्यांना थांबवले,” असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत अन्याय सहन केला, पण आता सहन करणार नाही,असा इशारा माध्यमा समोर देत बेंडवाल यांनी प्रशासन आणि आमदारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या आरोपांमुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.










