मेहकर (हॅलो बुलढाणा) शेतीमालाला आधीच भाव नाही, त्यात आता फसवणुकीच्या घटनांनी शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ठाण्यातील भामट्याने तब्बल १३,९३० किलो टरबूज घेऊन २ लाख २२ हजार ८८० रुपयांचा गंडा घातल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याला फेसबुकवरील एका जाहिरातीद्वारे ‘राहुल पाटील’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. टरबूजाचा माल चांगल्या दराने खरेदी करण्याचे आमिष दाखवत प्रतिकिलो १६ रुपये देण्याचे ठरले. विश्वास बसावा म्हणून व्हॉट्सअॅपवर फोटो, वजन व माहिती मागवून व्यवहार पक्का करण्यात आला.
यानंतर १८ मार्च रोजी शेतकरी स्वतः टेम्पोने माल घेऊन ठाण्याकडे रवाना झाला. १९ मार्चच्या पहाटे वागळे इस्टेट परिसरात पोहोचून टरबूज उतरवण्यात आले. मात्र, पैसे देण्याची वेळ येताच भामट्याने “ऑनलाईन पैसे पाठवतो” असा बहाणा करत शेतकऱ्याला थांबवले आणि काही वेळातच गायब झाला.
पहिल्या दिवशी “२४ तासांत पैसे येतील” असे सांगून वेळ मारून नेणाऱ्या आरोपीचा मोबाईल दुसऱ्या दिवशी बंद लागला. परिसरात चौकशी करूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून होणाऱ्या अशा व्यवहारांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर फसत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.










