spot_img
spot_img

बुलढाण्याच्या मातीतला ‘सेवाव्रती डॉक्टर’ मराठवाड्याच्या मानाच्या व्यासपीठावर झळकला! त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव–२०२६’; सभापती राम शिंदे व मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सन्मान!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या मातीतून सुरू झालेला रुग्णसेवेचा ध्यास थेट मराठवाड्याच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर गौरविला गेला! त्वचारोग उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण सेवाकार्याची दखल घेत जिल्ह्याचे सुपुत्र तथा प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांना प्रतिष्ठेच्या ‘मराठवाडा गौरव-२०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. गोंधणे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

बुलढाणा जिल्ह्याशी असलेली नाळ कायम ठेवत त्यांनी मराठवाड्यातील शहरी भागासह ग्रामीण व गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार त्वचारोग उपचार पोहोचवले. रुग्णसेवेला केवळ व्यवसाय न मानता सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारल्यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

“हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचा, हितचिंतकांचा आणि माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे,” अशी कृतज्ञ भावना डॉ. गोंधणे यांनी व्यक्त केली.

या दिमाखदार सन्मानाने बुलढाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!