spot_img
spot_img

शेतकरी चळवळीला नवी धार! महाबळेश्वरात क्रांतिकारींचा ‘प्लॅन ऑफ अॅक्शन’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा आक्रमक वळण देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना सज्ज झाली असून, 8 व 9 एप्रिल रोजी महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. या शिबिरात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील आंदोलनांची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

राज्यातील निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा शेतकरीपुत्र या शिबिरात सहभागी होणार असून, शेतकरी चळवळीतील सध्याची मरगळ झटकून नवचैतन्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. शेतीपूरक उद्योग, रोजगारनिर्मिती, संघटन कौशल्य आणि वैचारिक बांधणी यावर सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात वैचारिक मंथन, गटचर्चा, प्रश्नोत्तर सत्र आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असून, कार्यकर्त्यांना ‘ग्राउंड लेव्हल’वर अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी सज्ज केले जाणार आहे. 9 एप्रिल रोजी समारोप सत्रात रविकांत तुपकर यांचे मार्गदर्शन होणार असून, त्यातून आगामी काळातील आंदोलनांची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या बैठकीत संघटनेची पुढील रणनीती, संभाव्य आंदोलने आणि नवीन पदाधिकाऱ्यांची निवड यावर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही खळबळ उडवणारी ठरू शकते.

 तुपकरांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष!
प्रत्येक बैठकीत आंदोलनाचा ‘नवा बॉम्ब’ टाकणारे रविकांत तुपकर यावेळी कोणती आक्रमक भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वरातील हे शिबिर शेतकरी चळवळीचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरण्याची चिन्हे आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!