जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) ग्रामीण विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च होत असल्याचा दावा केला जात असतानाच जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. १५ व्या वित्त आयोगातून बांधलेला पाईप कलव्हर्ट पूल अवघ्या काही महिन्यांतच पाडून त्याच ठिकाणी पुन्हा नवीन पुलाचे काम सुरू केल्याने मोठा गैरप्रकार समोर आला आहे.
सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर २०२२-२३ मध्ये हा पूल उभारण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. ग्रामसभेने आक्षेप घेतल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराला तब्बल ४ लाख ८० हजार ८११ रुपयांचे बिल नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आले, ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे.
यापेक्षा गंभीर बाब म्हणजे मार्च २०२४ मध्ये पूर्ण झालेला पूल सप्टेंबर २०२५ मध्ये अचानक पाडण्यात आला. विशेष म्हणजे, पुलाच्या तोडफोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ग्रामपंचायतीचा ठराव नसल्याचे ग्रामसेवकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आता त्याच जागी पुन्हा ३४.६२ लाख रुपये खर्चून नवीन पूल व संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे सरकारी निधीची उघड उधळपट्टी आणि संगनमताचा संशय व्यक्त होत आहे.
या प्रकरणी इंजि. राजू समाधान इंगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली असून, “अवघ्या काही महिन्यांत पूल पाडण्याची वेळ का आली? बिल कोणी मंजूर केले? जुन्या पुलाचा हिशोब कुठे आहे?” असे थेट सवाल उपस्थित केले आहेत.










Total Users : 3290150