बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शहरात गॅस टंचाईच्या नावाखाली सुरू असलेल्या एजन्सींच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. इराण-अमेरिका संघर्षाचा बागुलबुवा उभा करून स्थानिक स्तरावर कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे केला जात आहे.
शहरातील परिस्थिती अक्षरशः भयावह बनली आहे. गॅस सिलिंडरसाठी महिला-पुरुषांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागत आहेत. पहाटे ४-५ वाजता पोहोचूनही नंबर २०० च्या पुढे जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. सणासुदीचे दिवस आणि रमजानचा काळ असतानाही नागरिकांना गॅससाठी अशी फरफट सहन करावी लागणे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे.
तांत्रिक बिघाडाचा दावा करत एजन्सी हात झटकत असली, तरी प्रत्यक्षात हा प्रकार संशयास्पद ठरत आहे. बुकिंग केल्यानंतर ४-५ दिवस OTP येत नाही, DAC नंबर मिळत नाही, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे सिलिंडर मिळण्यापूर्वीच ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा होते! म्हणजेच कागदोपत्री सिलिंडर वितरित दाखवून प्रत्यक्षात काळाबाजाराचा खेळ सुरू असल्याचा संशय अधिकच बळावत आहे.
पुरवठा निम्म्यावर आल्याचे सांगितले जात असले, तरी उपलब्ध गॅस नेमका कोणाला दिला जातोय? सामान्य ग्राहकांना ताटकळत ठेवून ‘मागच्या दाराने’ सिलिंडर विक्री होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.










