देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) विजेच्या तुटलेल्या तारेमुळे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी आळंद फाटा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून वीज वितरण यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव अश्रुबा ज्ञानबा घुले (वय 55, रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे आहे. घुले हे मागील पाच ते सात वर्षांपासून आळंद येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते. त्यांनी आळंद (ता. देऊळगाव राजा) परिसरातील शेती ठोका बटईने घेतली होती आणि शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घुले हे आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र शेताच्या वरून गेलेली वीजवाहिनी अचानक तुटून शेतात पडलेली होती. पाण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्यांचा त्या तुटलेल्या विजेच्या तारेस स्पर्श झाला आणि तीव्र विजेचा शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्घटना आळंद फाटा येथील गणपती मंदिराजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून तुटलेल्या व धोकादायक विजेच्या तारा वेळेत दुरुस्त न केल्यामुळे निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला, असा संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मृत अश्रुबा घुले यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










