सुलतानपूर (हॅलो बुलडाणा/मोईन खान) सध्याच्या काळात जिथे लहान-लहान कारणांवरून वाद निर्माण होतात, तिथे बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे सामाजिक सलोख्याचे आणि परस्पर आदराचे एक आगळेवेगळे उदाहरण पाहायला मिळाले. एका विवाह सोहळ्याच्या मिरवणुकीत ‘अजान’ सुरू होताच वऱ्हाड्यांनी स्वतःहून डीजे (DJ) बंद करून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर राखला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चि. सौ. कां. नेहा जगन्नाथ दीपकवार आणि चि. सचिन विजय पंचकवार यांचा विवाह सोहळा सुलतानपूर येथील ‘वेदांत आश्रम’ येथे संपन्न होत होता. सायंकाळच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड वाजत-गाजत सुलतानपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आले होते. सर्व वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचण्यात मग्न होती आणि वातावरणात आनंदाचा उत्साह होता.
तेवढ्यात संध्याकाळचे ६.३० वाजले. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र ‘रमझान’ महिना सुरू असून, ही वेळ ‘इफ्तार’ म्हणजेच उपवास (रोजा) सोडण्याची आणि मशिदीतून अजान देण्याची होती.
स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय
मशिदीतून अजानचा आवाज कानी पडताच, वऱ्हाडात सहभागी असलेल्या मंडळींनी आणि आयोजकांनी स्वतःहून (स्वयंस्फूर्तीने) डीजे बंद केला. अजान पूर्ण होईपर्यंत मिरवणूक शांत उभी होती. अजान संपल्यानंतर आणि रोजा सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली.या घटनेची दखल घेत शेख खाजा शेख उमर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन नवरदेव चि. सचिन याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सुलतानपूर येथील या घटनेचे व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असून, दोन्ही समाजातील नागरिकांकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.












