मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील उकळी गावात चोरट्यांनी अक्षरशः चित्रपटाला साजेसा थरार घडवत शेतकऱ्याच्या घरावर डल्ला मारला असून तब्बल 2 लाख 42 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अशोक रामकिशन धांडे (वय 56) हे शेतकरी आपल्या कुटुंबासह उकळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी यंदा आपल्या 12 एकर शेतीपैकी 10 एकरमध्ये सोयाबीन पेरले होते. त्यातील 35 क्विंटल सोयाबीन विकून त्यांना 1 लाख 28 हजार 700 रुपये रोख मिळाले होते. हे पैसे आणि अंदाजे 1 लाख 14 हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार त्यांनी घरातील मागील खोलीत कॅटलीत सुरक्षित ठेवला होता.
मात्र 26 फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी भन्नाट डाव आखला. घरातील जिन्यावरील पत्र्याच्या झाकणाची दोरी चक्क कापून त्यांनी घरात प्रवेश केला. धांडे हे शेतात झोपण्यासाठी गेले असताना घरात पत्नी, मुलगा आणि सून झोपलेले होते. सकाळी सहा वाजता पत्नी उठली असता कॅटली खाली पडलेली आणि उघडी दिसली. आत पाहताच रोख रक्कम आणि सोन्याचा हार गायब असल्याचे लक्षात येताच घरात एकच खळबळ उडाली.
चोरट्यांनी कोणताही आवाज न करता घरात प्रवेश करून थेट लक्ष्य गाठल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेने गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.












