डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) दि. २३ फेब्रुवारी २०२६ “स्वच्छता हीच ईश्वर सेवा” हा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती डोणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज केवळ औपचारिकतेपुरती न राहता थेट कृतीतून साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी झाडू हाती घेत शाळा व लगतचा बाजार परिसर अक्षरशः चकाचक करून टाकला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालप्रसादजी आखाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या श्रमदान उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कचऱ्याचे ढिगारे हटवून स्वच्छतेचा ठसा उमटवत विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या विचारांना खरी मानवंदना दिली. “फक्त भाषण नको, कृती हवी” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेत परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. डोणगावच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत होत असून, स्वच्छतेबाबत ठोस जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र आहे. गाडगेबाबांच्या जयंतीला डोणगावकरांनी दिलेली ही कृतीशील सलामी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.











