बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात शिवजयंती उत्साहात साजरी होत असतानाच महिलांच्या सुरक्षिततेला धक्का देणारी घटना समोर आली. शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दोन महिलांच्या गळ्यातील पोत (सोन्याची) चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तत्काळ दोन पैकी एका संशयिताला पकडून दिले.
घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त करत थेट मिरवणुकीतूनच आरोपीला जाब विचारत चोपून काढले. “शिवजयंतीसारख्या पवित्र आणि उत्साही सोहळ्यात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आरोपीला कडक शब्दांत दम भरला. या घटनेनंतर मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला.शहरात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होत असताना काही समाजकंटकांकडून अशा प्रकारचे प्रकार होणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.











