मलकापूर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसांपासून नागरिकांना रिलायन्स जिओ ची रेंज असूनही नेटवर्क सेवा ठप्प असल्याचा संतापजनक अनुभव येत होता. कॉल लागत नव्हते, इंटरनेट सेवा खंडित होती, ऑनलाईन व्यवहार अडकले होते. मात्र यामागचे खरे कारण नागरिकांना समजत नव्हते. आता मलकापूर शहर पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीमुळे धक्कादायक बाब समोर आली आहे.
मलकापूर हद्दीतील बेलाड गावातील जिओ टॉवर (आयडी MH-MLKP-EMD-9032) येथील फायबर ऑप्टिक केबल अज्ञातांनी कापून मोठी तोडफोड केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे संबंधित साइट पूर्णपणे बंद पडली असून कंपनीचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही तक्रार टॉवर मेंटेनन्सचे काम पाहणाऱ्या प्रताप टेक्नोक्रॅटस प्रायवेट लि. चे कंपनीच्या इस्टेट मॅनेजरकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पगारवाढीच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काही संपकरी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर टॉवर चालू देणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही तोडफोड संपाशी संबंधित आहे का? असा संशय बळावत आहे.
सात-आठ दिवस नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या या प्रकारामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. जाणीवपूर्वक नेटवर्क ठप्प करून जिल्ह्याला डिजिटल अंधारात ढकलण्याचा हा कट होता का? असा सवाल उपस्थित होत आहे.मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




Total Users : 3565427