मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर तालुक्यातील पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफू लागवडीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी रात्री गट क्रमांक १४८ व १२८ मध्ये छापा टाकला असता अफूचे भरघोस पीक आढळून आले.
या प्रकरणी भागवत सदाशीव काटे आणि विशाल रमेश काटे या दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशीव काटे यांच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची अफूची झाडे (किंमत अंदाजे ८६,१२,८०० रुपये) तर विशाल काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाची झाडे (किंमत ४५,८५,६०० रुपये) जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तालुक्यात या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला. इतर राज्यांत अफू लागवडीस कायदेशीर परवानगी व प्लॉट्स दिले जातात, मग महाराष्ट्रातच बंदी का? सोयाबीन आणि कापसाला भाव नाही, कर्जमाफी नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्याय द्यायलाच हवा. कायदेशीर चौकटीत अफू लागवडीला परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली.











