मुंबई (हॅलो बुलडाणा) देशातील पारंपरिक वैद्यक व्यवस्थेला नवे बळ देत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मुंबईतील जे.जे. रुग्णालय येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या युनानी संशोधन केंद्राचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. याच वेळी मुंबईत आयोजित ‘युनानी दिन 2026’ सोहळ्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
नवोन्मेष आणि पुरावे या दोन भक्कम स्तंभांवर युनानी औषधशास्त्राचे भविष्य उभे राहणार आहे, असा ठाम विश्वास प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार युनानी औषधशास्त्राची सक्षम परिसंस्था उभारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही राज्य सरकार युनानी उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी सातत्याने पाठबळ देईल, असे जाहीर केले. “सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात परिणामकारक उपचार सुविधा देण्याची ताकद युनानी पद्धतीत आहे,” असे ते म्हणाले.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी युनानी औषधशास्त्र आधुनिक, तथ्याधारित आणि जागतिक स्तरावर प्रमाणित आरोग्यसेवा म्हणून विकसित होत असल्याचे नमूद केले. तर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा डॉ. मनीषा व्ही. कोठेकर यांनी युनानीमुळे भारताची विविधतेतील एकता आरोग्य सेवेतही प्रतिबिंबित होत असल्याचे सांगितले.










