डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेंद्र पाटील पळसकर होते, तर उद्घाटन जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका वर्षाताई लांभाडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नवनिर्मित स्वयंपाक खोलीचे उद्घाटन भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. ज्योती बुरखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळणी व खाऊचे वाटप केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणाऱ्या नृत्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल डोंगरदिवे यांनी केले. शिक्षकवृंदाच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी ठरल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.










