spot_img
spot_img

‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीचा IMPACT : त्रिशरण चौक ते खामगाव मार्गावरील रस्त्याच्या कामांना अखेर वेग!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) त्रिशरण चौक ते सुंदरखेडमार्गे खामगावकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची आक्रमक बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने प्रसारित केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून खड्ड्यांनी अक्षरशः छलनी झालेल्या या महामार्गामुळे नागरिक त्रस्त झाले होते. वाहनधारकांचा संताप, वाढते अपघात आणि प्रशासनाची निष्क्रियता यावर ‘हॅलो बुलढाणा’ने थेट प्रश्न उपस्थित करताच यंत्रणा हालचालीत आली.

बातमी प्रसिद्ध होताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले. काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे तसेच रस्त्याचे समतलीकरण करण्याचे काम सुरू झाले असून अवजड यंत्रसामग्रीही दाखल करण्यात आली आहे. अनेक दिवस केवळ मुरूम टाकून दिखावा केल्याचा आरोप होत असताना आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. अपघात झाला तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करणाऱ्या नागरिकांच्या आवाजाला ‘हॅलो बुलढाणा’ने व्यासपीठ दिले आणि त्याचा थेट परिणाम प्रशासनाच्या कारवाईत दिसून आला.

मात्र, कामाची गुणवत्ता आणि गती यावरही आता नागरिकांची नजर राहणार आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. ‘हॅलो बुलढाणा’च्या धडक पत्रकारितेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाला कामाला भाग पाडण्यात यश आले असून, पुढेही नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!