मलकापूर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील वरखेड येथे मध्यरात्री एका शेतकऱ्याच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, नेमक्या कोणत्या कारणातून हे कृत्य करण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरखेड येथील 65 वर्षीय शेतकरी प्रकाश सुखदेव आगाशे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुलै रोजी रात्री 11 वाजता कुटुंबीय झोपले होते. त्यांची MH-28-AQ-3689 क्रमांकाची हिरो होंडा HF-Deluxe दुचाकी घरासमोर उभी होती.
रात्री साडेअकराच्या सुमारास खिडकीतून अचानक आगीच्या ज्वाळा दिसताच आगाशे कुटुंबीय बाहेर धावले. दुचाकी पेटलेली पाहून त्यांचा मुलगा गजानन आगाशे याने तातडीने पाणी आणून आग विझवली. मात्र तोपर्यंत दुचाकीच्या मागील भागाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले होते.
अज्ञात इसमाने जळाऊ वृत्तीने दुचाकी पेटवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे.










