मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या मेहकर येथील नूतन तहसील कार्यालयाच्या इमारतीची पोलखोल पहिल्याच काही पावसात झाली आहे. या नव्या इमारतीच्या वरील भागातील छप्पर लीक झाल्याने नागरिकांसाठी असलेल्या मुख्य बैठक व्यवस्था हॉलमध्ये पाणी गळत आहे. परिणामी हॉलमध्ये पाण्याची डबकी साचली असून, लाखोंचा खर्च करून उभारलेल्या या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी येतात. मात्र, बैठक हॉलच्या वरील छप्पर लीक असल्याने पाणी आत येत असून नागरिकांना बसण्यासाठी जागाच उरलेली नाही. दूरवरून आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना तासनतास उभे राहावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवीन इमारतीचे छप्पर पहिल्याच पावसात लीक कसे झाले? संबंधित कंत्राटदाराने नेमके कोणत्या दर्जाचे काम केले? गुणवत्ता तपासणारे अधिकारी कुठे होते? या संपूर्ण कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि छप्पर लीकची समस्या त्वरित दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी मेहकरकरांकडून होत आहे.










