बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आज जनजागृती बाईक रॅली काढून शहराचे लक्ष वेधून घेतले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजित करण्यात आली.
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्या ‘राह-वीर’ अर्थात गुड समरीटन योजनेबाबत प्रभावी संदेश देत, मदत करणाऱ्या व्यक्तीस ₹२५,००० बक्षीस दिले जाते तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही, ही महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. अपघातग्रस्तांना मदत करा, भीती बाळगू नका हा ठाम संदेश या रॅलीतून देण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुरू झालेल्या या बाईक रॅलीला स्वतः पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.










